Monday, June 26, 2017

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न



ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न

      सोलापूर- ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ‘मन की बात’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व जेष्ठ नागरिकांनी  मनात झाकून ठेवलेल्या सुख-दु:खाच्या गोष्टी सांगितल्या. 
        या कार्यक्रमात श्री.ब्रिजमोहन फोफलीया यांनी ब्रिजधाम आश्रम कसा उभारला, त्या पाठीमागची कारणे, आश्रम उभारताना आलेले अनुभव व्यक्त केले. वृद्धांची सेवा हाच माझा परमार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिक श्री. सुहास माने  यांनी ‘नाते’ ही कविता सादर करून मनातल्या गोष्टी सांगितल्या.
काय मोठे इपरीत घडले
नात्यामध्ये अंतर वाढले
जवळची मानसं मुकी झाली
व्हॉंसप फेसबुकला तोंड आले
नाते ही कविता श्रोत्यांना खूपच भावली. जेष्ठ नागरिक श्री.वामनराव सातपुते, श्री.राजाराम उपाध्ये, श्री.भानुदास रणभंगारे आदि नागरिकांनी मनातल्या गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी  जून महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सहा जेष्ठ नागरिकांचा हार घालून टाळ्यांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  श्री.ब्रिजमोहन फोफलीया यांनी सुख-समृद्धी लाभो, उत्तम आरोग्य लाभो असा आशीर्वाद वाढदिवस असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना दिला आणि  कार्यक्रमाची सांगता झाली.

     

Friday, June 23, 2017

श्री.ब्रिजमोहनजी फोफालीया यांचे कार्य आणि विचार


श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया
समृद्धी असते तिथे नैतिकता पाणी भरतेच असं नाही, जिथे नैतिकता असते तिथे सत्कर्म घडतेच असं ठामपणे सांगता येत नाही. परंतु आमच्या सोलापूरच्या मातीचा गुणच न्यारा जो सोलापूरच्या मातीत जन्मतो, वाढतो, जो सोलापूरहिच आपली कर्म भूमी मानतो तोच नितीमान बनतो. ही वस्तुस्थिती आहे. अनुभूती आहे. मुळचे राजस्थानचे परंतु सोलापूरच्या मातीत वाढलेले श्री.ब्रिजमोहन फोफलीया हे  सोलापूरचे भूषण बनले आहेत. कुणी त्यांना मानवदूत म्हणतात तर कोणी त्यांना तर कुणी त्यांना सामुदाईक विवाहाचे प्रनेनेते म्हणतात.
आपले पिता स्व.रामनिवासजी फोफलीया यांच्या स्मरणार्थ ३० मे १९९१ रोजी ३२ जोडप्यांच्या, २१ मे १९९५ रोजी १५२ जोडप्यांचा,  १९९८ मध्ये २३८, २००१ मध्ये ४०२, २०१६ मध्ये ११,  २३ मे २०१७ रोजी १८ जोडप्यांचा सर्व धर्मिय सामुदाईक विवाह करून सोलापूरच्या इतिहास बळकट केला. प्रत्येक जोडप्याचा पोशाख, वधूला मणी-मंगळसूत्र, संसार उपयोगी भांडी, त्या त्या समाजाचे धार्मिक विधी, मिष्ठान्न जेवण, वाजत गाजत वरात, भव्य मंडप यांचा सारा खर्च श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांनी केला.
विवाह म्हटलं कि वधू वर पित्याची आर्थिक कोंडी होते. हुंडा म्हटलं की पोटात गोळा येतो. किडूक मिडूक मोडून चीज वस्तू गहाण टाकून कसे बसे विवाह होतात. ही वाईट प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ सामाजिक बांधिलकी पत्करून ब्रिजमोहनजीनी सामुहिक विवाहाची संकल्पना राबवली. समाजहितासाठी, समाजाची भाग्यशाली पहाट निर्माण करणारे वाटसरू आहेत. समाज नितीमान, आदर्श घडला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे.
श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांनी संपूर्ण मोफत वृद्धाश्रम काढून समाजसेवेचा आणखी एक  वटवृक्ष सोलापूरच्या मातीत लावला आहे.
साम्राज्य  छोङ बुद्ध   ने कहा-
मानवता हित और सेवा सबसे ऊपर
हम भूले, विश्व में फैला बुद्धत्व।
ईशु ने  दिया  विश्व शांति,  प्रेम और  सर्वधर्म   सम्मान संदेश।
कुरआन ने कहा  जहाँ मानवता वहाँ अल्लाह।
गीता का उपदेश- कर्मण्यवाधिकारस्ते मा……
आजच्या तरुण पिढीला  ‘प्रायव्हसी’ या मोहमयी शब्दाने बधीर केलंय. छोटी कुटुंब पद्धती, जागा कमी, घरा घरातून टीव्ही, व्हिडीओचे संस्कारहीन वातावरण याचा परिणाम असा झाला कि  घरातील तणावपूर्ण वातावरण वाढले. वैचारिक, पारिवारिक मतभेत, वडीलधाऱ्या अनादर, या व अन्य कारणामुळे घराघरातून पांढरपेश्या मध्यम वर्गातील वृद्ध मंडळी, आढथळा बनली आहे. अशा वातावरणात वृद्धांच्या जीवाचा कोंडमारा होतोय. सुना-नातवंडे व मुलाकडून होणाऱ्या हेटाळणीमुळे, त्यांना जीव नकोसा वाटू लागतो. मग त्यांच्या समोर प्रश्न पडतो आता थकलेल्या अवस्थेत जायच कोठे ? मग जगण्यापेक्षा मरण बरे अशी त्यांची भावना होते. कुटुंबात तणाव वाढतो. मग एक दिवस तो वृद्ध वृद्धाश्रमात दाखल होतो.
            आज तरुण आणि वृद्धा मध्ये  वैचारिक दरी निर्माण झाली आहे. बाल्यावस्था आणि वृद्धपकाळ यात खरं तर फारसा फरक नसतो. परंतु बालकाकडे जसं लक्ष दिलं जातं तसं वृद्धांच्या बाबतीत होत नाही. वृद्धांना कुटुंबात प्रेम, आदर, सन्मान, आपुलकीची तीव्र गरज असते. असं नाही घडलं तर ते मावळवत्या जीवनाचा सूर्यास्थ पहात असतात. परंतु आज तरुण पिढी वृद्धांचा तिरस्कार करू लागली आहे. खरतर हा भारतीय संस्कृतीवर घाला आहे. यावर गांभीर्याने चिंतन होणे गरजेचे आहे. अशी ब्रिजमोहनजी यांची भावना आहे. पण हे सर्व अधिकाराने सांगणार कोणाला. जरी सांगितलं तरी आयकून घेणार कोण. याचा सारासार विचार  करून  स्वताच्या निगराणीखाली वृद्धाश्रम सुरु केले. त्याला नाव दिलं निम्बार्क ब्रिजधाम आश्रम.
            निम्बार्क ब्रिजधाम वृद्धाश्रम म्हणजे एक निसर्गरम्य हवेशीर ठिकाणच आहे. विजापूर रस्त्यावरील सोरेगाव जवळ, शहराच्या हद्दीत आगदी महामार्गाला खेटून वृद्धाश्रमाची इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. वृद्धाश्रमात ६० वर्षावरील वृद्ध स्री पुरषाला प्रवेश असून प्रत्येकाला कॉट, गादी, चादर, उशी, स्वतंत्र लॉकर, जेवणाची भांडी अशी व्यवस्था आहे. प्रार्थना घर, खेळण्यासाठी भरपूर मोकळी जागा, लायब्ररी, दूरदर्शन संच, सुमधुर आवाजाची योजना, सत्संग प्रवचनासाठी स्वतंत्र खुला कक्ष असून भेटायला येणाऱ्यांसाठी अथिती कक्ष आहे. वृधाश्रमात नियमित वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र पाकगृह,  स्वच्छता गृह अश्या अनेक समृद्ध सोयी आश्रमात आहेत.
            ब्रिजमोहनजी विनम्रपणे म्हणतात, व्यवसाय करून अर्थार्जन करताना आपल्या हातून काहीतरी परमार्थाचे काम व्हावे असे वाटते. दिनदुबळ्या पिडितांची सेवा करण्याची भावना मला परमेश्वरानेच दिली आहे. मानवता हेच माझ्या जीवनाचे उदिष्ठ आहे. वृद्धांना समजून घेऊन त्यांना ‘ प्यार भरा जीवन’ देणे हाच माझा परमार्थ आहे. 




* असा आहे आश्रम *
            सोलापूर शहरात एक लाख पन्नास हजारफुट जागेत वृद्धाश्रम उभारण्यात आला आहे. सोलापुरातच नाही तर  संपूर्ण महाराष्ट्रात २० वर्षापासून वृद्धांची सेवा करणारा एकमेव वयक्तिक प्रकल्प म्हणजे ब्रिजधाम आश्रम.
            आश्रमात वृद्धांसाठी चहा, नाष्टा, भोजन, श्री पुरषासाठी राहण्याची वेगळी व्यवस्था, ग्रंथालय, वैद्यकीय सेवा आदि अनेक सोयी सुवाधा आश्रमात दिल्या जातात. आश्रमात शांत रम्य वातावरण, भिंतीचित्रांनी सजवलेले अंगण, भव्य सुंदर बगीचा, सुसज्य स्वयपाक घर , भोजन कक्ष, एतिहासिक कलाकृतींनी सजवलेली भव्य वास्तू, संत निवास, अथिती कक्ष, अनेक प्रकारची फुलांची फळांची झाडे, कैलास पर्वत, शेष नाग असलेले शिवालय, ध्यान करण्यासाठी पुरातन काळातील झोपडी, आई वडिलांची सेवा करणाऱ्या साधू संताच्या मुर्त्या, मंद प्रकाश योजना, ध्वनी योजना, दूरदर्शन संच, सीसीटीव्ही कॅमेरे, लाकडी नक्षी काम केलेले ६० हजार फुटाचे भव्य  मैदान,एक हजार स्केअर फुटाचे शृंगाराने सजवलेला रंगमंच, अश्या अनेक वैशिठ्यानी आश्रम सजलेला आहे.
            २०१४ पासून प्रत्येक रविवारी आश्रमामध्ये , प्रबोधनाचे , मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत.















































Monday, June 5, 2017

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव मध्ये ४ जून रोजी काव्य मैफील संपन्न



ब्रिजधाम आश्रम सोरेगाव मध्ये काव्य मैफील संपन्न

सोलापूर – ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता काव्य मैफील आयोजित करण्यात आली होती. या काव्य मैफिलीत गझलकार श्री.कालिदास चवडेकर, कवी श्री.आनंद घोडके, कवियत्री वर्षा सरवदे, कवी प्रा.नवनाथ पाटोळे, कवीयत्री अपर्णा पटणे, कवी श्री.शहाजी  कांबळे आदि कवींनी सहभाग नोंदवला होता, या मैफिलीत जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कवी कालिदास चौडेकर यांनी हास्य गझल सादर करून श्रोत्यांना पोटधरून हसाय लावले. त्यांनी आपल्या कवितेतून महागाईला कंटाळून, नवऱ्याशी भांडणारी श्रीची व्यथा सांगितली, ते म्हणतात,
प्राण नाथा वाढवून द्या ना माझाही भत्ता
इतक्या पैश्यामध्ये मिळेना सादा कडीपत्ता
ताळमेळ लागेना कोठे ह्या खर्चाचा
डोक्याचा तर झाला आता नुसता खलबत्ता
कवी कालिदास हे हजलकार म्हणून प्रशिद्ध आहेत, त्यांनी आपल्या दुसऱ्या कवितेतून बायकोला माहेरी सोडून आल्यावर होणारा आनंद आणि दुख: याचे हाश्य चित्रण केले. ते म्हणतात,
हवेवर स्वार झालो मी हिला सोडून आल्यावर
सुखाने ठार झालो मी हिला सोडून आल्यावर
डबे शोधून थकलो मी, रिकामे वाजती ठणठण
उपाशी घार झालो मी हिला सोडून आल्यावर
कवी आनंद घोडके यांनी आपल्या कवितेतून मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात आई बापाचं मुलावर दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. ते म्हणतात
पाप्पाचे फेसबुक
आईचा व्हॉटसअप
दोगेही  ऑनलाइन
            मी मात्र चीडीचीप
नास्ता, जेवण खेळणे
बागडनेही ऑनलाइन
देवा पांडुरंगा तू तरी
आहेस कारे ऑफलाइन


आपल्या दुसऱ्या कवितेतून कवी आनंद घोडके यांनी विठ्ठलाचा महिमा सांगितला, ते म्हणतात,
भूवैकुंठी विसावला
माझा विठ्ठल सावळा
करी पापाचे क्षालन
देई पुंण्याचे आंदन
कवी प्रा.नवनाथ पाटोळे यांनी, आपल्या कवितेतून सर्व वृद्धाना तारुण्यात घेऊन गेले.  ते म्हतात,
आठवते मला तुझी पहिली भेट
तुझ्या मृगनयनांनी घायाळ केले
सिहसम कटीमधून तू मला
यौवनात उतरवले.
आता मात्र जीवाला
मोडून पडल्यासारखं वाटतंय
तुझ्या आठवणीन म्हातारपण
 कसं खायला उठताय
कवियत्री अपर्णा पटणे यांनी आपल्या कवितेतून   बाल वयातील , बालप्रेमाचे वर्णन केले त्या म्हणतात,
मी खेळतअसायचो अंगणात
आणि ऐकू यायचे तुझेपैजण
फुले तोडायला यायची तू
आणि तोडून न्यायची माझे मन
कवी शहाजी कांबळे यांनी, आपल्या कवितेतून मनात साठून राहिलेल्या जखमा कधीच कधीच डिलीट होत नाहीत . हे सांगितले, ते म्हणतात
विसरायचं सार, विसरायचं म्हणून विसरता येतं का ?

झाकल्या जखमा जरी,    वेदना थांबतात का ?
हसायचं किती खोटं खोटं, हसण्यालाच वाटते लाज
हसून गाईले गीत आसवांचे, असावे कधी हसतात का


कवी शहाजी कांबळे यांनी आपल्या दुसऱ्या कवितेतून, बाळाला बांधावर झोळीत टाकून काम करणाऱ्या आईचे वर्णन करून उपस्थितांची मने जिंकली, ते म्हणतात
तान्ह बाळ वटीला
नाही भाकर पोटाला,
पदर खोचून माय
गाठ घालते कामाला
गाय उपाशी रिकामी कास
काय दोष त्या वासराचा
थकल्या मायीला पाहून बाळ
गाली खुदकन हसायचा
कवियत्री वर्षा सरवदे यांनी आपल्या दुसऱ्या कवितेतून, श्री शक्तीचा जागर केला आहे, त्या म्हणतात
जननी म्हणजे श्री म्हणे
स्वर्गा पेक्षा महान
रोज तिला छळताना
विवेक ठेवता का गहाण
जिच्या उदरी जन्म घेतला
विटाळ तिचाच होतो
देवालयी पुजारी सुद्धा
दार लोटून घेतो

कवियत्री वर्षा सरवदे यांनी आपल्या कवितेतून पहिल्या पावसाचे वर्णन, त्या आपल्या  कवितेतून म्हणतात,
पाऊस आज पहिला, आला नभात तेव्हा
ओसंडल्या जलधारा मनात तेव्हा
आसुसली धरा हि , भेटीस साजनाच्या
मेघात पावसाची, सजली वरात तेव्हा
वर्षा सरवदे यांनी पावसाची कविता सादर केली आणि खरोखरच , ढगात गडगडत सुरु झाला, ब्रिजधाम आश्रमातील हिरवळ पावसाच्या आगमनाने अधिकच हिरवळ दिसत होती. ढगांचा गडगडत , कवीचे शब्द फुले, बहरलेली हिरवळ,  यामुळे काव्य मैफील अधिकच रंगली, जेष्ठ नागरिकांनी मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला. उपस्थित सर्व कवींचा मा.श्री ब्रिजमोहन फोफलीया यांच्या हस्ते   हार, आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री नागेश खामिकर यांनी या मैफिलीचे सूत्र संचालन केले.